राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत येण्यासाठी पुन्हा एकदा साद….

शेकापचे माजी आमदार जयंत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत येण्यासाठी पुन्हा एकदा साद घातली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शेट्टी यांनी नुकतीच जयंत पाटील यांची भेट घेतली होती. भेटीनंतर कोल्हापुरात आल्यानंतर पाटील यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली. आम्ही वारंवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना सांगत होतो.

तुम्ही महाविकास आघाडीमध्ये येऊन निवडणूक लढवा.पण त्यांनी चूक केली. आम्ही त्यांना पुन्हा आव्हान करतो की त्यांनी इथून पुढे महाविकास आघाडीत यावे आणि निवडणुका लढवाव्यात, अशी साद जयंत पाटील यांनी घातली.आताही शेट्टी यांना महाविकास आघाडीत येण्यासाठी विनंती केली आहे. त्यांना आघाडीत घेण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. शेट्टी यांच्यामुळे महायुतीला कोणता फायदा होईल? असं मी होऊ देणार नाही. मागील आठवड्यात शेट्टी यांनी माझी भेट घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने सन्मानाने शेट्टी यांना आघाडीत घ्यावे, असेही जयंत पाटील म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीत चार चार मत देण्याचे ठरवले होते. मात्र काँग्रेसकडून ती चार मते मिळाली नाहीत.जर ती मते मिळाली असती तर विजयाच्या जवळपास पोहोचलो असतो. काँग्रेस फुटलेल्या मतांवर कारवाई करेल. पण आज ना उद्या मी पुन्हा एकदा विधिमंडळात येईन अशी मला खात्री आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.दर पाच वर्षांनी शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन होत असते. यंदा हे अधिवेशन 2 ऑगस्ट रोजी पंढरपुरात होत आहे. किमान सात ते आठ हजार कार्यकर्ते या अधिवेशनासाठी दाखल होतील. यंदा या अधिवेशनाला मित्र पक्षांना देखील आमंत्रित करणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.