पूर्व विदर्भात पावसाचा पुन्हा जोर वाढला! महाराष्ट्र – मध्यप्रदेशसह शेकडो गावांचा संपर्क तुटला

 गेल्या दोन- तीन दिवसापासून उपराजधानी  नागपूरसह विदर्भात सुरू असलेल्या धुवाधार पावसाने सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. तर पूर्व विदर्भात अतिवृष्टी सदृश्य  पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा  नागपूरसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे. परिणामी अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागल्याने अनेक नदीनाल्याच्या काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबत अनेक गावांची मुख्य शहरांशी संपर्क तुटल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.

मध्यप्रदेशात होत असलेल्या पावसामुळे संजय सरोवर, पुजारी टोला आणि धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे भंडारा शहरातून वाहणारी वैनगंगा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. वैनगंगा नदीची धोक्याची पातडी 245.50 ही मध्यरात्री ओलांडली आहे. सध्या कराधा येथील पुलावरून तीन फूट पाणी वाहत आहे. प्रशासनाने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

‘या’ गावांना दिला सतर्कतेचा इशारा

बाघ नदीच्या किनाऱ्यालगत केहरीटोला, तिरखेडी, भाडीपार, बोदलबोडी, नदीटोला, दरबडा, धानोली, म्हसीटोला, साखरीटोला, झालीया, गोंडीटोला ही गावे तर बाघ (बहेला नदीच्या) किनाऱ्यावरील गल्लाटोला, लोधीटोला, चिंगलुटोला, खेडेपार, गुलाबटोला, कुंभारटोला, पठाणटोला, नवेगाव, पोवारीटोला कुआढास नाल्याच्या किनाऱ्यालगत असलेले घोंसी, गरुटोला या गावांनासुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या गावातील लोकांनी नदीकाठी जाऊ नये अशा सूचना महसूल विभागाने गावकऱ्यांना केल्या आहेत.

महाराष्ट्र – मध्यप्रदेशचा संपर्क तुटला 

मध्यप्रदेश आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं मध्यप्रदेशातील पुजारी टोला, संजय सरोवर या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आणि त्याचं पाणी महाराष्ट्राच्या सीमेतील  भंडाराजिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा नदीत प्रवाहित होत आहे. परिणामी, तुमसर तालुक्यातील बपेरा येथील बावनथडी नदीवरून तीन फूट पाणी वाहत असल्यानं महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.