वाळवा तालुक्यातील पेठ येथील एकतानगरमध्ये भाडेकरू म्हणून राहिलेल्या मूळच्या बीड येथील २१ वर्षीय महिलेने खोलीतील लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हा प्रकार मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आला. शिवकन्या शरद वाईकर (वय २१, सध्या रा. एकतानगर पेठ, मूळ रा. बीड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ज्या खोलीत आत्महत्या केली तेथेच बाजूला दीड वर्षांचे बाळ टाहो फोडून रडत होते. दरम्यान, तिचा पती शरद याने पत्नी मोबाइल फोन उचलत नसल्याने शेजारी राहणाऱ्या आपल्या मित्रास त्याच्या यरी जाण्यास सांगितले.
त्यावेळी ही आत्महत्येची घटना उघडकीस आली. येथील गजानन पांडुरंग हावळ यांच्याकडे खोली भाड्याने घेऊन पती आणि दीड वर्षाच्या मुलासह हे वाइईकर कुटुंब राहिल्या होत्या. पती शरद हा ट्रक चालक असून तो गुजरातला गेला होता. विवाहितेने गळफासाने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दीड वर्षांच्या बाळाला शेजारी राहणाऱ्या शरद वाईकर यांच्या मित्राकडे सोपवले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.