इचलकरंजी शहरातील अघोरी प्रकारावर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा….

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात पाण्याची तीव्र टंचाई तर जगजाहीर आहेच. त्याचबरोबर अनेक राजकीय समीकरणे बदललेली देखील पहिली त्याचपद्धतीने अनेक अवैद्य धंदे देखील राजेरोसपणे सुरु असल्याचे चित्र अलीकडे दिसतच आहे. अशातच आता इचलकरंजी शहरात अघोरी प्रकार उघडकीस येत आहेत. इचलकरंजी शहरात काही समाजातील काही पुजारी आघोरी प्रकार आणि भानामतीचे कृत्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या अमानवी प्रथांमध्ये गाब, शेळी व तिच्या पिल्लांचे बळी दिले जात असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भीमशक्ती संघटनेच्या वतीने कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच अप्पर पोलीस अधीक्षक, इचलकरंजी यांच्याकडे निवेदनाद्वारे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, या आघोरी प्रकाराची वारंवार पुनरावृत्ती होत असून, प्राण्यांचा निर्दयतेने बळी दिला जात आहे. या कृत्यांमुळे समाजात अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असून, कायद्याचे उल्लंघन होत आहे.

हा प्रकार लवकरच होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी वेळीच कारवाई करावी, अन्यथा तीव्र  आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी दिला. यावेळीसंघटनेचे पदाधिकारी राहुल जावळे, अमोल जावळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेच्यावतीने मागणी करण्यात आली आहे की, या प्रकारात सामील असलेल्या पुजाऱ्यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी. याबाबत पोलिसांनी वेळीच पाऊले न उचलल्यास, भीमशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.