गुरूवारी संपूर्ण दिवसरात्र पाऊस सुरूच होता. राधानगरीत धरणाची स्वयंचलित दारे उघडण्यात आली होती. तसेच कोयना पाणलोट क्षेत्रातूनही मोठा विसर्ग सुरू होता. या सर्वाचा धक्का घेऊन नदी काठावर असणाऱ्या या गावांनी सुरक्षित स्थळी काल रात्रीपासूनच स्थलांतरास सुरुवात केली आहे. शिरोळ तालुक्यात अत्यंत संवेदनशील पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पूरग्रस्त गावे म्हणून शासन दरबारी नोंद असणारे खिद्रापूर, राजापूरवाडी, राजापूर, दानवाड, अक्किवाट या गावातील नागरिकांनी रात्रीपासूनच स्थलांतरास सुरुवात केली आहे. यामध्ये पाळीव प्राणी, घरातील वस्तू, इलेक्ट्रिक साहित्य याचा समावेश आहे. अनेकांनी आपल्या घरातील लहान मुले आणि महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यावर भर दिला आहे.
सर्व नागरिकांची एकाच वेळी बाहेर पडण्यासाठी धांदल सुरू झाल्याने वाहनांच्या गावातील चौकात रांगाच रांगा लागल्या आहेत. ज्याची त्याची आपली साहित्य आणि पशुधन वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. साहित्य व जनावरे वाहतुकीसाठी घेऊन जाणारे आणि घेऊन जाण्यासाठी येणारी वाहने यांची गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडीही होत आहे. यावेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी शासनाकडून महामंडळाच्या एसटीची सोय करण्यात यावी अशी मागणी होत आहे.