आजपासून मतदान संपेपर्यंत ओपिनियन, एक्झिट पोलला बंदी

आज बुधवार, दि. 13 पासून मतदानाच्या दिवशी, बुधवार दि. 20 रोजी सांयकाळी साडेसहा वाजेपर्यंत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दाखवण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

या अनुषंगाने निवडणूक मतदान प्रक्रिया होईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी 48 तासांच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.