सांगोला तालुक्यातील मौजे अनकढाळ गावचे शिवारात नाझरा मठ ते राजुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून पूर्व बाजूला असलेल्या कुटे मळ्याकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्याचे उत्तरेस लिंगे यांच्या शेतामध्ये अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचा इसम जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता. सदर इसमास कोणत्या तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून ठार मारून अंगावर काहीतरी ओतून पेटवून देऊन पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणून मौजे अनकढाळ येथील बाळासो पाटील यांनी फिर्यादी जबाबदावरून सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केलेला होता.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड हे करीत होते. पंधरा महिन्यापूर्वी झालेल्या या खुनाचा सांगोला पोलिसांनी छडा लावलेला आहे. सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण कडील पथकांनी कसोशीने समांतर तपास करून खुनातील मयताची ओळख पटवून आरोपीस अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे यांनी दिली आहे.
विशाल बनसोडे राहणार संभाजीपुर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अकरा एप्रिल ला अनकढाळ टोलनाक्याजवळ दोघांमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणी कारणावरून वाद झाला आणि त्यातून मयत रमण सावळे यास मारहाण करून गळा दाबून खून केला आणि त्यानंतर पेट्रोल व डिझेल आणून मयत रमण साबळे यांच्या शरीरावर टाकून त्याचे शरीर ओळखू येऊ नये याकरता जाळून टाकले असल्याचे त्यांने सांगितले.