मेडशिंगी पोटनिवडणुकीत सर्वच उमेदवारांनी घेतले अर्ज मागे; निवडणुक रद्द होण्याची नामुष्की

मराठा आरक्षणाची ठिणगी आता ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पडली असून सांगोला तालुक्यातील मेडशिंगी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील सर्वच उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे पोटनिवडणुक रद्द होण्याच्या मार्गावर आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक नाही असा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. तर वाढेगाव ग्रामपंचायतीची १ जागा तर ह. मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील १ जागा बिनविरोध झाली आहे..

सांगोला तालुक्यातील सावे, वाढेगाव, चिकमहुद, खवासपूर या ४ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक प्रकिया सुरु असून बुधवार दि. २५ रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १३८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले तर सरपंच पदाचे ३१ उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता सरपंच पदाच्या ४ जागेसाठी ११ जण तर सदस्य पदाच्या ५० जागासाठी ११३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब आजमावित आहेत. चिणके येथील १ जागेच्या पोटनिवडणुकीसाठी दुरंगी लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तहसिल कार्यालयाबाहेर उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांनी एकच गर्दी केली होती. सावे व वाढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दुरंगी लढत होणार आहे.

चिकमहुद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी तिरंगी लढत तर खवासपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चौरंगी लढत होणार आहे. सावे ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी २३ उमेदवार, वाढे गांव ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांच्या जागेसाठी २८ उमेदवार, चिकमहूद ग्रामपंचायतीच्या १५ जागेसाठी ३६ उमेदवार तर खवासपूर ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांनी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली. त्यात काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी यश आलं नाही.. त्यामुळे निवडणुका अटळ झाल्या आहेत. गावपातळीवर कोणामध्ये लढती रंगणार हेदेखील आता निश्चित झाले असल्यामुळे आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मित्रं, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात लढतानाचे चित्रंही दिसणार असून काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी थेट चौरंगी लढत पाहायला मिळणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता सांगोलावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.