महायुतीच्या जागावाटपाचं ठरलं? 

लोकसभा झाली, विधानपरिषद झाली आता विधानसभेसाठी राज्यात जय्यत तयारी सुरू आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपावरुन महायुतीत जोरदार हालचाली सुरू आहेत. तसं तर, महायुतीतील सर्व पक्षांनी आपापली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. भाजपची 288 जागांची तयारी सुरू आहे. पण मिळतील तेवढ्या जागा लढवू, असं वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेनं आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 93 मतदारसंघांमध्ये निरीक्षक नेमले आहेत. पण सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार असल्याचं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. तर जागावाटपावरून महायुतीत कोणताही वाद नसल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी बोलताना सांगितलं की, “जागावाटपासंदर्भात महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत. आता फक्त आम्ही 93 मतदारसंघात निरीक्षक नेमलेले आहेत, मात्र 288 मतदारसंघातसुद्धा निरीक्षक नेमणार आहोत. भाजपही 288 निरीक्षक नेमणार आहे, तर राष्ट्रवादीसुद्धा 288 जागांवर निरिक्षक नेमणार आहे.”

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितलं की, “भाजपची 288 जागांवर लढण्याची तयारी आहे, पण महायुतीत लढण्याचा निर्णय ठाम आहे. महायुतीत जेवढ्या जागा मिळतील, त्या लढवू, पण तयारी 288 जागांची आहे. उरलेल्या जागांची तयारी मित्र पक्षांसाठी वापरू.” तसेच, जागावाटपाबाबत मतभेद नाही, स्वबळाचा प्रश्नच येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे. 

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुतीतील जागावाटपावरुन बोलताना जोरदार टोला हाणला आहे. प्रत्येक पक्ष भुमिका ठरवतो आणि नेते ठरवतात. नारायण राणे यांना किती पक्ष किंमत देतो? हे पाहावं लागेल, बाकी अजित दादा आणि आमच्या गद्दारांना किती तुकडे टाकतात? ते पाहावं लागेल, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.