देशभरात सध्या निवडणुकीचा वार वाहतं आहे. काहीच दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशात कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा होत आहे. अशातच काही नेत्यांचं पक्षांतरही पाहायला मिळू शकतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. बड्या महिला नेत्याचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय या महिला नेत्याला लोकसभेला उमेदवारीही दिली जाण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधी उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. अशात भाजपच्या नेत्या ॲड. ललिता पाटील यांना ठाकरे गटात घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. पुढच्या दोन दिवसात ललिता पाटील या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत ललिता पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे.
जळगावमध्ये ललिता पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरु आहे. जर ललिता पाटील यांनी ठाकरे गटाच प्रवेश केला तर जळगावमधून लोकसभेसाठी त्यांचं नाव निश्चित होणार असल्याची शक्यता आहे. ॲड. ललिता पाटील या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर भाजपच्या पदाधिकारी आहेत. ॲड. ललिता पाटील यांनी काल मुंबईत मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे ललिता पाटील लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.