कृष्णाघाट मिरज व ढवळी येथील पूरस्थितीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी…..

संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. पूरस्थितीच्या अनुषंगाने शासन, प्रशासन ज्या सूचना देते त्याचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. राज्य शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.नागरिकांनी घाबरून जावू नये तथापी दक्ष रहावे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज कृष्णाघाट मिरज व ढवळी येथील पूर परिस्थितीची पाहणी करून जनावरांसाठी चारा वाटप केले.

ते पुढे म्हणाले, पूरबाधित नागरिकांच्यासाठी निवारा केंद्र, भोजन, आरोग्य सुविधा, जनावरांसाठी चारा, पाणी आदीची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात येईल. नागरिकांनी काळजी करू नये, येणाऱ्या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करावा. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जावू नये तसेच स्वत:सह कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी उत्तम दिंघे, मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, माजी आमदार उल्हास पाटील, संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, नागरिक उपस्थित होते.