कोल्हापूरमध्ये मुलीची हत्या आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात १०० टक्के बंद पाळण्यात येणार आहे. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सकाळी ९ वाजता मूक मोर्चा काढून स्टेशन चौकात निषेध सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली. बंदच्या पार्श्वभूमीवर सांगलीत गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मोर्चा व निषेध सभा घेण्याचा निर्णय झाला. बैठकीस काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, उद्धवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, बजरंग पाटील, डॉ. संजय पाटील, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, प्रा. एन. डी. बिरनाळे, हरिदास पाटील, आशा पाटील, ज्योती अदाटे, धनपाल खोत, उत्तम कांबळे, सागर घोडके आदी उपस्थित होते.
मूक मोर्चामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आंदोलकांनी डाव्या हाताला काळ्या फिती लावून सहभागी व्हावे. निषेध म्हणून काळा शर्ट घातला तरी चालेल, असे आवाहन संजय विभुते यांनी केले. यामध्ये व्यापारी, शाळा, महाविद्यालयांसह सर्व व्यवहार १०० टक्के बंद असणार आहेत. केवळ रुग्णालये व वैद्यकीय औषधांची दुकाने चालू असणार आहेत. या बंदमध्ये महाविकास आघाडीचे सर्व पक्ष सहभागी होणार आहेत. दि. २४ रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे. स्टेशन चौकात निषेध सभा घेण्यात येणार आहे