जिल्ह्यात चार तालुक्यांत पूरस्थिती उद्भवली असताना दुष्काळी जत आणि आटपाडी तालुक्यांत ४४ गावे आणि ३६६ वाड्यांना ५१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये जत तालुक्यातील ३९ आणि आटपाडी तालुक्यातील ५ गावे समािवष्ट आहेत.
सव्वा लाखाहून अधिक लोकसंख्येला हा पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्ह्यात यंदा निम्मा जुलै झाल्यानंतर पावसाने जोर धरला. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या खोऱ्यात गेले काही दिवस मुसळधार वृष्टीही झाली. कोयना आणि वारणा धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. मात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत गेली.त्यामुळे शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस या चार तालुक्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली. चार हजारांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाला दिलासा मिळाला आहे.
एकीकडे, अशी चार तालुक्यांत पूरसदृश स्थिती असताना दुसरीकडे जत, आटपाडी या तालुक्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विशेषकरून जत तालुक्यातील ४१ गावे सध्या टंचाईग्रस्त आहेत. आटपाडी तालुक्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई आहे.
खानापूर तालुक्यातील तीन आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावात टंचाईची स्थिती आहे. अशा एकूण ५१ गावांमध्ये टंचाईची परिस्थिती आहे. त्यापैकी जत तालुक्यातील ३९ गावे आणि ३०७ वाड्या, तर आटपाडी तालुक्यातील ५ गावे आणि ५८ वाड्यांना ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
गतवर्षी ३२ टक्के कमी पाऊस झाला होता. त्यामुळे नोव्हेंबरपासूनच दुष्काळ तालुक्यात पाणीटंचाई जाणवली होती. विशेषकरून जत आणि आटपाडी तालुक्यातील गावे टंचाईग्रस्त झाली होती. आता पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही ५१ गावे आणि ३६५ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. त्यापैकी ४४ गावे आणि ३६५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सुमारे एक लाख २६ हजार २०४ लोकसंख्या आणि २८ हजार ३०५ पशुधनाला हा पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्हा सध्या चार तालुक्यांत पूरस्थिती आणि दोन तालुक्यात टंचाई स्थितीचा अनुभव घेत आहे. एकीकडे ४२ हजार लोकसंख्या आणि सुमारे २७०० पशुधनाचे पुरामुळे स्थलांतर करण्यात आले आहे, तर दुसऱ्या बाजूला सव्वा लाख लोकसंख्या २८ हजार पशुधनाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे.