सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्टेशन चौक येथील हॉटेल स्टार पॅलेसमध्ये सुरु असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकलाय. यावेळी सांगली आणि इतर जिल्ह्यातील दोन महिलांची सुटका करण्यात आलीये.
या प्रकरणी हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एजंटला आणि हॉटेल मालकाला अटक करण्यात आलीये. एजंट शोएब आणि लॉज चालक गुरुप्रसाद कृष्णमूर्ती अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, महिला एजंट स्वाती ही फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्ह्यात जबरदस्तीने महिलांकडून वेश्या व्यवसाय करायला लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले होते. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांना सांगलीतील स्टार पॅलेस हॉटेलमध्ये महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसरा बोगस ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली. यानंतर सापळा रचून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी हॉटेल स्टार पॅलेसवर छापा टाकला. यावेळी त्याठिकाणाहून दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी याठिकाणाहून हॉटेल मॅनेजर शोएब मिस्त्री आणि हॉटेल चालक गुरुप्रसाद शेट्टी या दोघांना अटक केली. तसेच दोन महिलांची यातून सुटका केलीये.