सांगली लोकसभेमध्ये कॉंग्रेसचे बंडखोर विशाल पाटलांना भाजपच्या (BJP) चार नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्व पदाचा राजीनामा देत पाठिंबा जाहीर केला आहे. राजीनामा देत विशाल पाटलांचा उघड प्रचार सुरू केला आहे. विशाल पाटलांच्या प्रचारसभेत सहभाग घेतल्याच्या कारणावरून भाजप कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
मिरजेतील भाजपच्या नगरसेवकांकडून विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतल्याच्या कारणातून भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांकडून संबंधित चार नगरसेवकांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. मात्र कारवाईच्या आधीच भाजपचे बंडखोर नगरसेवक संदीप आवटे, निरंजन आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी आपल्या भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
त्याबरोबर भाजपमधल्या आणखी तीन नगरसेवकांचा छुपा पाठिंबा असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजयकाका पाटील यांच्या बद्दल मिरजेतल्या भाजप नगरसेवकांमधील असणारी नाराजी उघडपणे आता समोर आली आहे. या अगोदर देखील भाजपच्या दोन माजी आमदारांनी राजीनामा देत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहेच अजित घोरपडे आणि विलासराव जगताप या दोन माजी आमदार आणि यापूर्वीच भाजपला रामराम करत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे.