सांगली गेल्या महिनाभरापासून कृष्णा नदीकाठावरील पलूस तालुक्यातील गावागावांत चोऱ्या वाढल्या आहेत. चोरट्यांची टोळी कोणत्याही वेळी दरोडा टाकू शकते, या भीतीने ग्रामस्थांनी रात्रभर जागून गस्त सुरू केली आहे. त्यामुळे या परिसरातील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांपुढे चोरट्याने पकडण्याचे आव्हान आहे. कादी दिवसांपूर्वी भरदिवसा घरात घुसून महिलांना चोरट्यांनी मारहाण करण्याची घटना घडली. त्यामुळे चोरांच्या भीतीने पलूस तालुक्यातील गावागावात भीतीचे वातावरण आहे.
पलूससह कडेगाव, वाळवा व मिरज तालुक्यात सध्या चोरट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. मध्यरात्री जोरात दार वाजवणे, भरदिवसा महिलांना मारहाण करून लूट करणे, चेन स्नॅचिंग अशा घटनांमध्ये वाढ झाली.गावोगावी सध्या चोरांच्या भीतीने रात्रभर गस्त सुरु आहे. कृष्णाकाठावर ऊसशेती जास्त प्रमाणात असल्याने चोरटे त्याचा लपण्यासाठी वापर करत आहेत. तुंग (ता. मिरज) येथे नुकताच एका चोरीचा प्रयत्न फसला. गोटखिंडीमध्ये चोर दिसले, अशा घटना दररोज ऐकावयास मिळत आहेत. त्यामुळे अनेक निरपराध परप्रातिय मजुरांनाही मारहाणीच्या घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांनीही सतर्क राहून गावोगावी गस्त वाढवणे गरजेचे आहे.”