कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.
धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे, त्यात दिवसभरातील पाऊस पाहता कोल्हापूरकरांची पुन्हा धाकधूक वाढली आहे. हवामान विभागाने गुरुवार व शुक्रवार दोन दिवस कोल्हापूरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. त्यानुसार पाऊस सुरू असून गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी जोर अधिक आहे.
जोरदार सरी कोसळत असल्याने सगळीकडे पुन्हा पाणी पाणी झाले आहे. पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले होते, मात्र पावसाचा जोर वाढल्याने ते पुन्हा वाढू लागले आहे.धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे.
राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ५७८४, वारणातून ११५५२ तर दुधगंगेतून ९१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराच्या पाण्याची फुग वाढू लागली आहे. पंचगंगा नदीची पुन्हा धोक्याकडे वाटचाल सुरू असल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. दुपारी एक नंतर पुराचे पाणी हळूहळू वाढू लागले आहे.