भारत – पाकिस्तान तणावस्थितीमुळे एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेली आयपीएल 2025 (IPL 2025) ही शनिवार 17 मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. नवीन वेळेपत्रकाप्रमाणे 3 जून रोजी स्पर्धेचा फायनल सामना पार पडणार असून शेड्युलमध्ये बदल झाल्याने अनेक संघांच्या अडचणी वाढल्या आहेत, काही विदेशी क्रिकेटर्स त्यांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे आयपीएलचे उर्वरित सामने खेळण्यासाठी भारतात परतणार नाहीत. त्यामुळे फ्रेंचायझींकडून रिप्लेसमेंट खेळाडूंची नाव समोर येत आहेत.
मुंबई इंडियन्सने दोन खेळाडूंना केलं शॉर्टलिस्ट :
आयपीएल 2025 च्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे तब्बल 5 वेळा आयपीएलचा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्स संघाला सुद्धा फटका बसला आहे. जर संघ प्लेऑफमध्ये क्वालिफाय करतो तर इंग्लंडचा विल जॅक्स आणि साऊथ आफ्रिकेचा रयान रिकेल्टन हे दोघे स्पर्धेतून बाहेर होतील. या दोन खेळाडूंची रिप्लेसमेंट म्हणून इंग्लंडचा खेळाडू जॉनी बेयरस्टो आणि रिचर्ड ग्लीसन या दोघांना मुंबई इंडियन्स उर्वरित सीजनसाठी आपल्या संघात सामील करून घेऊ शकते. मुंबईच्या शेवटच्या दोन ग्रुप-स्टेज सामन्यांपूर्वी विल जॅक्स भारतात परतला आहे परंतु आंतरराष्ट्रीय ड्युटीमुळे तो प्लेऑफसाठी उपलब्ध राहणार नाही. इंग्लंड वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळणार असून यात सहभागी होण्यासाठी त्याला जावे लागेल.
आयपीएलमध्ये लगावली 2 शतक :
इंग्लंडचा क्रिकेटर जॉनी बेयरस्टोने आतापर्यंत आयपीएलचे 5 सीजन खेळले आहेत. तो यापूर्वी सनरायजर्स हैदराबाद (2019-21) आणि पंजाब किंग्स (2022 -24) यांच्यासाठी खेळणार आहे. या काळात त्याने 50 सामन्यांमध्ये 34.54 च्या सरासरीने आणि 144.45 च्या स्ट्राईक रेटने 1589 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये दोन शतकं आहेत.
जॅक्स आणि रिकेल्टनची जबरदस्त कामगिरी :
इंग्लंडचा विल जॅक्स हा आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा महत्वाचा भाग राहिलाय. त्याने 12 पैकी 11 सामने खेळले असून 9 इनिंगमध्ये 195 धावा केल्या आहेत, त्याने गोलंदाजी करताना 5 विकेट सुद्धा मिळवल्या. तो सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जाएंट्स प्लेअर ऑफ द मॅच सुद्धा ठरला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी साऊथ आफ्रिकेने आपल्या संघातील खेळाडूंना 27 मे पर्यंत मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. साऊथ आफ्रिकेचा रयान रिकेल्टन हा या सीजनमध्ये रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्सकडून सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 12 सामन्यात आतापर्यंत 336 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सचे सामने कधी ?
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सला 14 लीग स्टेज सामने खेळायचे होते. त्यापैकी मुंबई इंडियन्सचे 12 लीग स्टेज सामने खेळण्यात आले असून आता केवळ 2 सामने शिल्लक आहेत. आयपीएल 2025 च्या जुन्या वेळेपत्रकानुसार मुंबईचा संघ 11 मे रोजी धर्मशाला स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध सामना खेळणार होता. तर शेवटचा लीग सामना वानखेडे स्टेडियमवर 15 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळणार होता, मात्र आता आयपीएल स्थिगित केल्यावर नवीन वेळापत्रक समोर आलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार मुंबई इंडियन्स बुधवार 21 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना खेळेल. तर सोमवार 26 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात जयपूरच्या स्टेडियमवर सामना होईल.
