गणेश मंडळांसाठी आनंदवार्ता! एकाचवेळी मिळणार पुढील ५ वर्षांसाठी…..

येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे (Ganeshotsav 2024) आगमन होणार आहे. यासाठी एक दोन महिन्यांपूर्वीच सर्व गणेशभक्त गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज होतात. तसेच ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन होण्यास सुरुवात होते. परंतु त्याआधी मंडळांना महापालिकेकडून (BMC) मंडप बांधण्याची परवानगी घ्यावी लागते. काही दिवसांपूर्वीच महापालिकेने गणेश मंडळाना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ‘एक ऑनलाइन खिडकी योजना’ राबवून देण्याची घोषणा केली होती. परंतु ही योजना सुरु करण्यासाठी यंदा विलंब झाल्यामुळे गणेश मंडळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गणेश मंडळांसाठी आनंदाची घोषणा केली आहे. त्यानुसार मंडळांना आता एकाच वेळी पुढील पाच वर्षांसाठी मंडप उभारण्याची परवानगी मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी लागणाऱ्या परवानगीसाठी ‘एक ऑनलाइन खिडकी योजना’ ६ ऑगस्टपासून सुरू केली जाणार आहे. त्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयानुसार गेली दहा वर्ष नियमांचे आणि कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांसाठी विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी गेल्या दहा वर्षांत सर्व नियम कायदे याचे पालन केले आहे आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.

मात्र या मंडळांना दरवर्षी परवानगी नुतनीकरण करावे लागणार आहे.त्याचबरोबर यंदा नव्यानेच सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी देण्यात येणारी मंडप उभारणीची परवानगी ही एका वर्षासाठीच मर्यादित असणार आहे.गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ६ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाइन एक खिडकी पद्धतीने अर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे.