इचलकरंजी पावसाने उसंत दिली असली तरी धरणातून विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे पंचगंगा नदीला आलेला पूर संथगतीने ओसरू लागला आहे. शनिवारी सायंकाळी पाण्याची पातळी ७० फुट ३ इंचावर होती. पंचगंगा अद्याप इशारा पातळीवर आहे. दरम्यान, ज्या भागातून पुराचे पाणी ओसरू लागले आहे, त्या भागात महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिम तर महसुल विभागाच्यावतीने पंचनामे करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी धरणक्षेत्रासह सर्वत्रच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान मोठी धरणे भरली आहेत तर विविध नद्यांना पुराने वेढले आहे. येथील पंचगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडून पुराचे पाणी नागरीवस्तीत शिरले होते. त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरी करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, विविध धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने पूर इंचा- इंचाने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे.
पूर ओसरलेल्या भागात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वच्छतेची विशेष मोहिम राबविण्यात आहे. बागडी गल्ली, मुजावर पट्टी, पट्टी, शेळके मळा, जुना चंदूर रोड, टाकवडे वेस परिसर आदी भागात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम राबवून पाण्याने रस्ते स्वच्छ करून औषध फवारणी करण्यात येत आहे. तर महसुल विभागाच्यावतीने पूर आलेल्या भागामध्ये जाऊन पंचनामे करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पंचनाम्या दरम्यान आलेल्या अधिकाऱ्यांकडून घराची पाहणी करून विविध कागदपत्रे घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.