इस्लामपुरात जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक…..

गौरव नायकवडी यांची इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना पक्ष निवडणूक प्रभारीपदी निवड झाली. त्यामुळे आगामी विधानसभेला पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात शिवसेनेने आतापासूनच रणशिंग फुंकले आहे.शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी उमेदवारीसाठी वर्षा निवासस्थानावर ठाण मांडून आहेत. इस्लामपूर मतदारसंघ कसल्याही परिस्थितीत महायुतीमध्ये शिवसेनेसाठी घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नायकवडी व पवार यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत.

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी आणला आहे. परंतु, शहरातील विकासकामांच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळालेला नाही. महायुतीकडून सर्वाधिक विकास निधी मतदारसंघात आणल्याचा दावा सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. विशेषत: जयंत पाटील यांचेही समर्थक निधी आणल्याचा दावा करत आहेत. काही महिन्यातच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास कामांना ब्रेकही लागेल. तरीसुद्धा आगामी २०२४ ची विधानसभा लढण्यासाठी जयंत पाटील समर्थक तयारीला लागले आहेत.विरोधात म्हणून उमेदवारी मिळण्यासाठी भाजप व शिवसेनेतील इच्छुक आग्रही आहेत.

परंतु, महायुतीकडून आजही उमेदवार निश्चित नसल्याने राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी जयंत पाटील यांच्या प्रचाराची जबाबदारी हाती घेतली आहे.जयंत पाटील यांच्याकडे राज्यातील महाआघाडीची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना इस्लामपूर मतदारसंघात वेळ देता येणार नाही. कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून एकत्रित काम केले, तरच जयंत पाटील यांना २०२४ ची विधानसभा सोपी जाईल. अन्यथा महायुतीतील विरोधक एकवटल्यास निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

वाळवा-इस्लामपूर मतदारसंघातील सात विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांची मतांची आकडेवारी १९९०-८१०१८, १९९५-९४६०५, १९९९-८३११२, २००४-१२०८३०, २००९-११०६७३, २०१४-११३०४५, २०१९-११५५६३ विरोधकांना आव्हान देणारी आहे. हा मतदारसंघ शिवसेनेकडेच असावा, असा अलिखित ठराव महायुतीत झाला. त्यामुळे २०१९ मध्ये गौरव नायकवडी यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी घेतली. २०२४ चीही उमेदवारी शिवसेनेलाच असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार आणि गौरव नायकवडी यांनी केला आहे.