महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एक जागा रिक्त असल्याचे सूचक विधान केल्यानंतर, महाविकास आघाडीतील एका मोठ्या नेत्याच्या भाजपामध्ये प्रवेशाबाबत चर्चांना वेग आला आहे.या चर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांचे नाव मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे.
आमदार जयंत पाटील १६ फेब्रुवारीला वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यानंतर १७ फेब्रुवारीला नितीन गडकरी यांच्या हस्ते सांगलीतील आरआयटी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात जयंत पाटील आणि भाजपा नेत्यांची जवळीक अधोरेखित होऊ शकते. त्यामुळे ते वाढदिवसानंतर भाजपामध्ये प्रवेश करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार जयंत पाटील यांच्या मौनामुळे त्यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जर त्यांनी पक्षांतर करायचेच ठरवले, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) पेक्षा ते भाजपाला प्राधान्य देतील, असे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब त्यांचे मौन सुटल्यावरच होईल.