सध्या राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, याकडे लक्ष वेधत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी व्यवस्था करू असा शब्द शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. राज्यातील भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. जयंत पाटील म्हणाले, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची काम करण्याची पद्धत साधी आहे. आमच्याकडे साधन संपत्ती मर्यादित आहे, मात्र महाराष्ट्र राज्यातील जनतेचा आशीर्वाद व शरदचंद्र पवार नावाची मोठी शक्ती आमच्याकडे आहे.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही नक्की यशस्वी होवू. चंदगड, कागल विधानसभा मतदारसंघाचा विकास हेच आमचे ध्येय आहे. शरदचंद्र पवार यांना दगा दिलेल्या, गद्दारांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी एकसंघपणे ताकद उभे करून प्रत्येक घराघरात तुतारी चिन्ह पोहोचवावे. राज्यातील भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी महिलांसह महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक संघपणे प्रचार करावा असे आवाहन त्यांनी केले. राज्यात सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांनी हे सरकार बदलण्यासाठी आपली पावले पुढे टाकण्याची गरज आहे. त्यामुळे जनतेने साथ देऊन शरचंद्र पवार यांचे हात बळकट करावेत असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.