स्थानिक नेत्यांसह उमेदवारांचा लागणार कस

इस्लामपूर मतदारसंघात आता चारही उमेदवारांचा कस लागणार आहे. या ठिकाणी आपल्या पक्षाचे उमेदवार नसतानाही ही निवडणूक महायुती म्हणजेच भाजप व महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी या पक्षातील स्थानिक नेत्यांचा कस लावणारी ठरेल.या दोन्ही आघाड्यांनंतर राजू शेट्टींचेही मतदारसंघात आव्हान कायम असेल.सत्यजित पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धैर्यशील माने यांच्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडिक, सदाभाऊ खोत, विक्रम पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार तर स्वाभिमानीच्या राजू शेट्टींसाठी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे.

ही निवडणूक जयंत पाटील व निशिकांत पाटील यांचा मतदारसंघावरील प्रभाव दाखवणारी ठरेल, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर राजू शेट्टींचा तळागाळातील संपर्क दाखवणारी ठरेल. या मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादीचा संघर्ष दिसून येईल. हेवीवेट नेते व सर्वसामान्य जनता यांच्यातील एकमत की खासदारकीसाठी आपल्याला हवा तो उमेदवाराची निवड हेही पहावे लागेल. या मतदारसंघात ऊस दर, विकासकामे व त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न हे पाहूनच मतदार मतदान करण्याची शक्यता आहे.