कोल्हापूरच्या राजाचे जल्लोषात आगमन….

कोल्हापूर – ढोल-ताशांचा गजर…नेत्रदीपक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि हजारो कोल्हापूरकरांच्या साक्षीने रंकाळावेस येथील गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरचा राजाच्या गणेशमूर्तीचे आगमन झाले.गणशोत्सवाला महिना बाकी असतानाच दरवर्षीप्रमाणे मंडळाने मुंबईहून ही गणेशमूर्ती आणली. रविवारी सायंकाळी बाप्पाच्या दर्शनासाठी कोल्हापूरकरांनी तावडे हॉटेल परिसरात मोठी गर्दी केली होती.

तावडे हॉटेल परिसरातून जाणाऱ्या वाहनधारकांना मात्र वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. विघ्नहर्त्याच्या स्वागताला वाहतूककोंंडीमुळे विघ्न निर्माण झाले. यामुळे पोलिसांचीही मोठी तारांबळ उडाली.कोल्हापूरमधील सार्वजनिक, तसेच समाजप्रबोधन गणेशोत्सवाची सुरुवात करणाऱ्या रंकाळवेश गोल सर्कल मित्रमंडळाचे हे यंदाचे १२ वे वर्ष आहे. लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळे यांनी ही मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती प्रभावळीसह १४ फूट उंच आहे. मुंबईतील गणेश चित्र शाळेतून बाहेर निघणारा हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा राज्यातील पहिलाच गणपती आहे.

लालबाग येथील गणेश कार्यशाळेतून ही मूर्ती रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तावडे हॉटेल चौकात आली. तेथे या मूर्तीचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. अनेक जण आपापल्या मोबाइलमध्ये मूर्तीची छबी टिपत होते. ढोल-ताशा पथक, विद्युत रोषणाईत गणेशमूर्ती कोल्हापूर शहरात आणण्यात आली. ही मूर्ती गणेश उत्सवाच्या आदल्या दिवशी रंकाळा स्टँड येथील मंडपात विराजमान होते.