गुरुवारपासून कोल्हापुरात नेत्यांची मांदियाळी, भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन ! शरद पवार, एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे…..

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध प्रत्येक पक्षाला लागलेले दिसून येत आहे. आतापासून तयारी देखील करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. अनेकांनी स्वबळाचा नारा हाती घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या आठवड्यात विधानसभा निवडणुकीनंतर राजकीयदृष्ट्या शांत झालेल्या भागात आता पुन्हा एकदा राजकीय धुरळा पहायला मिळणार आहे.

गुरुवारपासून म्हणजेच २३ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे ही नेतेमंडळी जिल्ह्यात येत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना व्हाइट आर्मीच्या वतीने गुरुवारी म्हणजेच २३ जानेवारीला आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी शरद पवार गुरुवारी कोल्हापुरात येणार आहेत. शुक्रवारी ते सांगलीला रवाना होणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही येत्या शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सरवडे (ता. राधानगरी) येथे आभार दौऱ्याचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील पंचकल्याण महोत्सवास शिंदे उपस्थितीत राहणार आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवारलिखित मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहाणार आहेत…