झेंडू लागवड कशी करावी? मिळवाल लाखोंचे उत्पन्न! A टू Z माहिती वाचा सविस्तर……

धार्मिक आणि  सामाजिक उत्सवांमध्ये  झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व आहे.  झेंडूच्या फुलांना दसऱ्याला खूप मागणी असते.  त्यामुळे या काळात  झेंडूचे मोठं उत्पन्न घेतलं जातं.  झेंडूची फुले खराब न होता बराच काळ टिकतात.  ही फुले खुल्या बाजारात विकली जातात तसेच  हार बनवण्यासाठीही वापरली जातात.  झेंडूचा वापर भारतात लग्नाच्या विधींना सजवण्यासाठी केला जात असल्याने या फुलांना जास्त मागणी आहे.  ही प्रामुख्याने सजावटीची वनस्पती आहे. त्याची जगभरात लागवड केली जाते. 

हवामान:  

राज्यात झेंडूचे उत्पादन तिन्ही हंगामात घेतले जाते आणि त्याला नेहमीच मागणी असते.  झेंडू हे प्रामुख्याने थंड हवामानातील पीक आहे, परिणामी झेंडूची वाढ आणि फुलांचा दर्जा  थंड  हवामानात चांगला असतो.  झेंडूची लागवड पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये  केली जाते.  फुले मध्यम हवामानात चांगली वाढतात. रात्रीचे १५ ते १८ अंश सेल्सिअस तापमान झाडाच्या वाढ व उत्पादनासाठी पोषक असते. जास्त पाऊस या पिकास हानिकारक ठरतो.

झेंडूसाठी जमीन 

झेंडूची लागवड विविध प्रकारच्या जमिनीत करता येते.  सुपीक, पाणी टिकवून ठेवणारी, परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी माती झेंडूसाठी चांगली असते.  सामू ७ ते ७.५ पर्यंत, भरपूर सेंद्रिय कर्बनी युक्त जमिनीत रोप चांगले वाढते. झेंडू पिकाला भरपूर सूर्यप्रकाश लागतो.  झाडे सावलीत चांगली वाढतात पण फुले कमी मिळतात.लागवडीपूर्वी  प्रथम जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. सपाट वाफा, सरी वरंबा आणि रुंद सरी किंवा गादीवाफ्यावर झेंडूची लागवड करतात.

लागवडीसाठी जमीन तयार रताना पुरेसे शेणखत जमिनीत मिसळावे. झेंडूची लागवड करताना ६० से. मी. अंतरावर घेतलेल्या सरीच्या मध्यभागी ३० से. मी. इतके दोन रोपांमधील अंतर ठेवून लागवड करावी. ६० X ३० से. मी. अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४०,००० रोपे लागतात. लागवड करतांना भरपूर पाण्यामध्ये व सायंकाळी ४ नंतर लागवड करावी. लागवड करताना रोपांची मुळे कॅप्टन ०.२ 5% द्रावणात १० मिनिटे बुडवून लावावीत.  म्हणजे रोपांची मर होत नाही.

खते आणि पाणी व्यवस्थापन :

झेंडूसाठी १०० : ७५ : ७५ किलो नत्र, स्फुरद आणि पालाश या रासायनिक खताची मात्रा शिफारस करण्यात आली आहे. संपूर्ण स्फुरद व पालाश तसेच अर्ध्या नत्राची मात्रा लागवडीच्या सुरवातीला द्यावी. उरलेले अर्धे नत्र पुनर्लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी द्यावे. नत्राची मात्रा जास्त झाल्यास झेंडूची शाकीय वाढ भरपूर होते व फुलांचे कमी उत्पादन मिळते. पहिली खुरपणी झाल्यानंतर झेंडूच्या पिकाला हेक्टरी २५ किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश  देऊन झाडांना मातीची भर लावावी.  

फक्त नत्रयुक्त खत अथवा अधिक नत्र वापरु नये. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये विद्राव्य खताचा वापर करावा. माती ओलसर राहील परंतु पाणी साचणार नाही याची खात्री करण्यासाठी नियमित अंतराने सिंचन केले पाहिजे. खरीप हंगामात पाऊस नसेल तर १५ ते २० दिवसांनी हिवाळ्यात १० ते १५ तर उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे.

फुलबहाराच्या काळात, झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देवू नये. जास्त पाण्यामुळे रूट कुजणे आणि बुरशीजन्य रोग होऊ शकतात. तसेच याच काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये.

कीड आणि रोग:

झेंडूवर बुरशीजन्य रोगांचाही परिणाम होऊ शकतो, जसे की भुरी आणि करप्या.  कोणतीही प्रभावित पाने काढून टाका आणि आवश्यक असल्यास बुरशीनाशकाने उपचार करा.पांढरी माशी, मावा, तुडतुडे प्रादुर्भाव आढळल्यास एसिफेट- १ ग्राम किंवा  डाय मिथोएट – १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. लाल कोळी पासून झेंडूचे संरक्षण करण्याकरिता डायकोफॉल २ मिली १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे. केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी १लिटर पाण्यात २मिली क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.