हळदीला सोन्याचे दिवस आल्याने यंदा हळदीच्या बियाणे दरात दुप्पटीहून वाढ झाली आहे. मागील वर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हळदीचे लागवड कमी झाल्याने हळदीचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे हळदीच्या बियाणे दरात वाढ झालीय.आता सांगली बाजारात आंध्र प्रदेशमधील सेलमहून हळदीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून गेल्या वर्षी ३ हजार ५०० रूपये असलेला दर यंदा ८ हजार ४०० रूपये क्विंंटलवर पोहचला आहे.
अक्षयतृतीया झाल्यानंतर हळद लागवडीची धामधूम सुरू होते. यंदा अक्षय तृतीया झाल्यानंतर हळद लागवडीची तयारी सुरू झाली असली तरी उन्हाळी पावसाचे प्रमाण कमी आहे. हळदीला यंदा क्विंटलला सरासरी १७ हजार ५०० रूपयांचा दर मिळाला असून यंदा दराचा विक्रम नोंदवत हळदीने ७५ हजार दराचा कळसही गाठला होता. यामुळे यंदा हळद लागवड वाढण्याची शक्यता गृहित धरून हळदीचे सुमारे २०० ते २५० टन बियाणे सेलमहून मागविण्यात आले आहे. गेल्या वर्षी हळद बियाणाचा दर तीन हजार ते साडेतीन हजार रूपये क्विंटल होता. यंदा मात्र, हळदीचे बियाणेच अल्प प्रमाणात उपलब्ध आहे.