किणी टोलनाका आंदोलनप्रकरणी काँग्रेसच्या २२ कार्यकर्त्यांवर गुन्हे

जिल्हा काँग्रेसतर्फे कोल्हापूर ते पुणे रस्त्यांची दुरवस्था व नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल शनिवारी आंदोलन पुकारले होते. किणी टोल नाका येथे माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील आंदोलनाचे नेतृत्व करीत होते. ते रस्त्याच्या बाजूला आंदोलन करीत होते.

यावेळी २० ते २५ कार्यकर्त्यांनी महामार्गावर बसून महामार्ग बंद केला. दरम्यान, पोलिसांनी वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे, असे सांगून बाजूला होण्यास सांगितले. परंतु, उठण्यास नकार देऊन आंदोलन सुरूच ठेवले. यामुळे कोल्हापूर, पुण्याकडे जाणरी वाहतूक ठप्प केली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल योगेश राक्षे यांनी फिर्याद दिली. किणी टोल नाका आंदोलनप्रकरणी काँग्रेसच्या २२ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले.

त्यांच्यावर महामार्ग बेकायदेशीररीत्या रोखून धरणे व आदेश डावलणे यासारखे गुन्हे दाखल झाले. याप्रकरणी संजय विष्णू पोवार-वाईकर, प्रशांत कांबळे, विक्रम खवरे, शशिकांत खवरे, सनी शिंदे, उत्तम पाटील, बाजीराव सातपुते (सर्व रा. शिरोली), कपिल पाटील (रा. भादोले), विश्‍वनाथ पाटील (शिये), मोहन सालपे, अजित धामेडकर, रमेश ऊर्फ नाना उलपे (रा. कसबा बावडा), उत्तम सावंत, तानाजी सावंत(रा. नागाव), राहुल खंजिरे (रा. इचलकरंजी), सुभाष ऊर्फ बापू जाधव (रा. कोल्हापूर),

दुर्वांश ऊर्फ पप्पू कदम (रा.कोल्हापूर), बबन रानगे (रा. वाशी), शहाजी सिद (रा. घुणकी), विलास आनंदा जाधव (रा. चावरे), सुरेंद्र विष्णू धोगडे (रा. चावरे), संपत भोसले (रा. केर्ली) यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस निरीक्षक विलास भोसले तपास करत आहेत.