कागल तालुक्यातील वेदगंगा नदीच्या दोन्ही काठांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपासह केबल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. सरासरी दीड दोन महिन्यांनी शेतकऱ्यांना चोरीच्या घटनेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी बस्तवडे, कौलगे तसेच नानीबाई चिखली येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपासह केबल चोरी झाल्या होत्या.
तर चार दिवसांपूर्वी आणूर येथील आठ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांसह केबलची चोरी झाली. यामध्ये त्यांना ७० हजारांहून अधिक आर्थिक फटका बसला आहे. सुभाष चौगुले, पाणीपुरवठा योजना, शरद गंगाधरे, सदाशिव गंगाधरे, शिवाजी चौगुले, बारबाई पाणी योजना, रामचंद्र गोते आदींच्या कृषी पंपांची केबल चोरीस गेली.
मोटर, केबल जाळून तारेची चोरी
नदीकाठावरील विद्युत पंप व केबलचे अनावश्यक ओझे टाळण्यासाठी चोरट्यांनी लाकडे जमा करून पंप व केबल जाळून त्यातील तांब्याच्या तारा चोरल्या.
कृषी पंपाचे इतर भाग त्याच ठिकाणी पडलेले असले तरी त्या भागाचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्यानेच पंप खरेदी करावे लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे शेतकरी सुरेश सुभाष चौगुले यांनी सांगितले.