पेठनाका चौकातील रस्ता दुरुस्ती,मुरुमीकरनाची मागणी!

वाळवा तालुक्यातील पेठनाका ते शिराळा मार्गावर अशाप्रकारे मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये पाणी साचले आहे. यामध्ये मध्यभागी बॅरिकेट उभे केले आहे. याचा प्रवाशांना त्रास होतो आहे. पेठनाका चौकातील रस्त्यावर मुरूम टाकून तो रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या स्टाईलने या रस्त्यावर आंदोलन केले जाईल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते सागर खोत यांनी रस्ते दुरुस्ती बांधकाम विभागाला दिला आहे.

याबाबत अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सूचना केल्या आहेत. वाळवा तालुक्यातील पेठनाका चौकात शिराळा रस्त्याच्या मधोमध भागात मोठा खड्डा पडला आहे. छोटे छोटे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना खड्डे दिसत नाहीत. या ठिकाणी खड्डे चुकवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. येथे टू व्हीलर वाहनधारकांचे अपघातदेखील झालेले आहेत.

दरम्यान, या रस्त्याच्या मधोमध ठिकाणी बॅरिकेट उभे केल्याने तात्पुरता अपघात होण्याचा धोका टळला आहे. परंतु रस्त्याच्या मध्येच बॅरिकेट उभे केल्यामुळे वाहनधारकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता अपुरा पडत आहे. या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनधारकांची दमछाक आहे. म्हणूनच रस्त्याचे मुरुमीकरण करावे, अशी मागणी खोत यांनी केली आहे.