वाळवा तालुक्यातील खरातवाडी येथील प्रतीक हणमंत खरात (वय २१) या तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी प्रतीकचे चुलते माणिक खरात यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी व त्यांचे बंधू हणमंत एकत्रित राहण्यास आहेत. रविवारी रात्री घरातील सर्वजण जेवण करुन झोपी गेले.
प्रतीकही आपल्या खोलीत झोपण्यास गेला होता. सोमवारी सकाळी प्रतीकचे आई- वडील, चुलते शेतात गेले. ते १० वाजता घरी आले, तेव्हा प्रतीकच्या खोलीचा दरवाजा बंद होता. आजुबाजूच्या लोकांनी येऊन दरवाजा तोडला, तेव्हा प्रतीकने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. प्रतीक हा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई- वडील, बहिणी असा परिवार आहे.