यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव दि. ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. राज्य शासनाच्यावतीने सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार दिला जाणार आहे. राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे, यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परिपूर्ण अर्ज दि. ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळांना मागील सलग दोन वर्षे राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झाले असल्यास ते मंडळ पारितोषिकास पात्र ठरणार नाही. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.
राज्यातील पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून अनुक्रमे ५ लाख रुपये, २.५ लाख रुपये आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील मंडळाला २५ हजार जिल्ह्यातून प्रत्येकी एक मंडळाचे नाव, सर्व कागदपत्रे व व्हिडीओसह राज्यस्तरीय निवड समितीकडे माहिती पाठवली जाईल. जिल्ह्यातील विजेत्या मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाईल.
जिल्हा स्तरीय समितीकडून उत्सवस्थळी भेट देऊन अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी समिती अध्यक्ष असतील. तसेच कला प्राध्यापक, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी हे सदस्य असतील. नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव असतील.
सांस्कृतिक कार्यक्रम, संस्कृतीचे जतन, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, ध्वनिप्रदूषण विरहित वातावरण याची पाहणी केली जाईल. पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा, दिल्या जाणाया सुविधांची पाहणी करून गुणांकन दिले जाणार आहे.
गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांना ३१ ऑगस्ट पर्यंत mahotsav. pla@gmail.com या ई-मेल आयडीवर अर्ज करावे लागतील. मुदतीत अर्ज आलेल्या मंडळांचीच पाहणी केली जाणार आहे.