कोल्हापूर, सांगलीवरील महापुराचा धोका टळला

आलमट्टी जलाशयात साठा वेगाने वाढत असतानाही शनिवारी विसर्ग तब्बल एक लाखाने कमी करण्यात आला आहे.शुक्रवारी संध्याकाळीपर्यंत दीड लाख असलेला विसर्ग शनिवारी केवळ ४२ हजारांपर्यंत केला आहे.

आवकही मोठ्याप्रमाणात घटली असून दोन लाखांवरील आवक आता केवळ ९७ हजार ८३८ इतकी आहे.गुरूवारी संध्याकाळपासून शनिवारी संध्याकाळपर्यंत दोन दिवसात धरणात तब्बल दहा टीएमसी पाणीसाठा अधिक झाला आहे. विशेष म्हणजे दीड लाख क्युसेक विसर्ग कायम असतानाही साठा अधिक वाढत होता.

शुक्रवारी धरणात अडीच लाख क्युसेक आवक असतानाही विसर्ग दीड लाख ठेवला होता. आता शुक्रवारपासून शनिवारपर्यंत एक लाख ८ हजार क्युसेक विसर्ग कमी करण्यात आला आहे. तर, आवकही दीड लाखाने कमी झाली आहे. त्यामुळे विसर्ग मोठ्याप्रमाणात कमी करण्यात आला आहे. आता येणाऱ्या पाण्यात धरणात अधिक साठा करून घेण्याचे नियोजन धरण प्रशासनाचे आहे.

चिक्कोडी विभागातून कृष्णेत शनिवारी पाणी वाहून येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. कल्लोळजवळ केवळ ७० हजार क्युसेक पाणी वाहून येत होते. शनिवारी धरणात ११३.७५७ टीएमसी पाणी साठा झाला आहे. आता विसर्ग लाखाने कमी झाल्याने दोन दिवसांत पाणीसाठा अधिक वाढणार आहे. त्याबरोबरच दोन दिवसांत धरणातील विसर्ग पूर्ण बंद केले जाण्याची शक्यता अधिक आहे.