पुणे कोल्हापूर प्रवाशांची संख्या लक्षात घेता, बसफेऱ्या वाढवल्यापुणे कोल्हापूर

कोल्हापूरहून पुण्याकडे आणि पुण्यावरून कोल्हापूरकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील वातानुकूलित एसटी बसच्या फेऱ्या या वाढवण्याचा निर्णय कोल्हापूर विभागाद्वारे घेण्यात आला आहे. या वाढवलेल्या फेऱ्यांना प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. पुणे आणि कोल्हापूर दरम्यान कोल्हापूर विभागाकडून फेऱ्यांची संख्या ४० पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. फेऱ्या वाढविल्या असल्याने कोल्हापूर पुणे प्रवास आणखी आरामदायी झाला असून यामुळे प्रवाशांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून पुणे कोल्हापूर मार्गावर लाल परी व्यतिरिक्त जन शिवनेरी, इलेक्ट्रिक शिवाई तसेच शिवशाही बसेस दर अर्धा ते एक तासाला सोडण्यात येत होत्या. मात्र प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवासी वर्गांमधून केली जात होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेता परिवहन मंडळाने फेऱ्यांची संख्या ४० पर्यंत नेली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री साडे अकरा पर्यंत दर अर्ध्या तासाला कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर बसेस निघत असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केला जात आहे. याशिवाय या मार्गावर प्रवाशांच मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दररोज कामानिमित्त पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. विविध सरकारी ऑफिस, आयटी इंडस्ट्री मध्ये काम करणारी मुले तसेच शिक्षणासाठी आणि व्यापारासाठी हे प्रवासी नेहमी पुणे कोल्हापूर प्रवास करत असतात. शिवशाही व शिवाई बसच्या एका फेरीसाठी प्रति प्रवासी तिकिट ५०० रुपये दर आकारण्यात येत असून जन शिवनेरीसाठी ५२५, रूपये तिकीट दर आकारण्यात येतो. शिवाय या बसेसमध्ये महिला सन्मान योजनेंतर्गत महिला प्रवासींना ५० टक्के सवलत, तर ६५ वर्षावरील नागरिकांसाठी ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षावरील नागरिकांसाठी मोफत प्रवास असल्याने या फेऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना चालवल्या जात आहेत.