गेला महिनाभर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आणि त्यानंतर निवडणुकीचे वातावरण शांत होऊ लागले. शेतकरी शिवारातील ऊस लवकरात लवकर साखर कारखान्यास घालवण्यासाठी खटाटोप करत आहेत. यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुकीमुळे ऊस गाळप हंगाम उशिराने सुरू झालेला आहे. त्यामुळे सांगोला येथील शेतकरी आपला ऊस लवकरात लवकर जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
मात्र सांगोला तालुक्यांमध्ये ऊस टोळ्यांची संख्या कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांना वेळेवर ऊस तोडणारी टोळी मिळत नाही त्यामुळे शेतकरी ऊस टोळी कारखान्यांकडे फेऱ्या मारत आहेत. दरम्यान सांगोला तालुकानजीक असणाऱ्या साखर कारखान्यांकडे ऊस टोळ्या दाखल झालेल्या आहेत. त्यांनी विविध गावात जाऊन ऊस तोडणी सुरु केलेली आहे.
अनेक भागात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या अद्यापही दाखल होत आहेत. यामध्ये मांजरी, संगेवाडी, मेथवडे, बामणी, सावे, चिंचोली, धायटी या भागात ऊस तोडणीसाठी आला असताना टोळी मिळेना अशी समस्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे. परिणामी शेतकरी कारखान्यांकडे हेलपाटे मारत आहेत त्यामुळे ऊस तोडणीसाठी टोळी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.