वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील ब्रह्मानंद महाराज मठालगत असणाऱ्या नदीकाठावर संरक्षण भिंत व घाट या कामासाठी जलसंपदा विभागाकडून तीन कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. कृष्णा नदीला 2005 – 6 व 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे या नदीकाठचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मठालगत असणाऱ्या परिसरात घाट व संरक्षण भिंत बांधून या परिसराला एक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या अनेक दिवस या परिसरातील ग्रामस्थांनी केलेली होती.
याची दखल घेत लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील यांनी या कृष्णा नदीच्या उजव्या तीरावर पूर संरक्षण भिंत व घाट व्हावा यासाठी शिवसेनेचे नेते आमदार स्व. अनिलभाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा प्रभागास प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आमदार बाबर यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा केला.
दरम्यानच्या काळात बाबर यांचे निधन झाल्यानंतर या प्रस्तावास युवा नेते अतुलबाबा भोसले, खासदार धैर्यशील माने आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पाठपुरावा करत हा निधी जितेंद्र पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजूर करण्यात आलेला आहे.