कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर आज, मंगळवारपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने निवेदनाद्वारे कळविले आहे.
या काळात ‘अत्यावश्यक सेवा’ मात्र सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वरिष्ठ डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, या निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेक नियोजित शस्त्रकिया रद्द कराव्या लागण्याची शक्यता आहे तसेच नियोजित शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नाही.
तसेच काही रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय सेवेची आवश्यकता नसेल अशा रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे तसेच सर्व अध्यापक वर्गाला बाह्यरुग्ण विभाग आणि रुग्ण दाखल असलेल्या रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.