विशाळगडाच्या पायथ्याला घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. लोकांना वरती जाऊ न दिल्याने त्यांनी तेथील धार्मिक स्थळावर हल्ला केला. लोकांची घरे फोडून, तिजोऱ्या लुटून संपत्ती नेली.शिवप्रेमींचे लक्षण नसून पुण्यातील किंवा कुठूनतरी वेगळ्या ठिकाणावरून आलेले गुंड आहेत. अशा पद्धतीने कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल.
त्यामुळे सरकारचे हे मोठे अपयश आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. आता परत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, ही शेवटची संधी आहे, असे काही आमदारांना वाटते आहे. त्यामुळे अनेक आमदारांचे मंत्रिपदाचे स्वप्न किमान दोन महिने तरी पूर्ण होऊ दे. यासाठी अनेक जण मागे लागले आहेत, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.
राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेक चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाले. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तारावर कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती.