गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेसाठी जतमधून तयारी सुरू केली आहे. यावर गोपीचंद पडळकर यांचा मतदारसंघ आटपाडी असताना जतमध्ये का ? असा सवाल करत माजी आमदार विलासराव जगताप यांनी एकप्रकारे रवी पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय. जत विधानसभा मतदारसंघात धनगर, लिंगायत व बहुजन समाजाची मोठी संख्या आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभेला विरोधी भूमिका घेतल्याने जत तालुक्यात भाजपकडे सर्व समाजाला एकसंध ठेऊन कार्य करणारा मोठा नेता नाही. त्यामुळेच गोपीचंद पडळकर यांनी जतमधून लढण्याची तयार दर्शवीली आहे.
तर गोपीचंद पडळकर यांना भाजपमधून मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तरूण नेतृत्व तमणगोंडा रविपाटील यांनी जनकल्याण संवाद यात्रेच्या माध्यमातून निवडणुकीचे संकेत दिले आहेत. यातच रवीपाटील यांना माजी आमदार विलासराव पाटलांचाही पाठिंबा असल्याचे समजत आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.दरम्यान, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या वैभव पाटलांनीही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. गोपीचंद पडळकर जर जतमधून लढणार असतील तर त्यांचे बंधू ब्रह्यानंद पडळकर खानापुरातून लढण्यास इच्छूक आहेत. यासाठी त्यांनी आतापासूनच संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सूरूवात केलीय.