इस्लामपूर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण? राजकीय हालचालींना वेग

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच इस्लामपूर विधानसभा मतदार संघात मतदार संपर्क संवाद मेळावा घेऊन दौरा पूर्ण केला. आगामी विधानसभा निवडणुकीची मशागत केली, तर भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी साधलेल्या मशागतीत राष्ट्रवादीतील अनेक गटांचे भाजप प्रवेश करीत साखरपेरणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीकडून जयवंतरावांची उमेदवारी अंतिम आहे. मात्र महायुतीत कलगीतुरा सुरू आहे.

शिंदेसेनेतून गौरव नायकवडी, आनंदा पवार यांची नावे चर्चेत आहेत. भाजपामध्ये गटबाजीचे ग्रहण आहे. भाजपातून निशिकांत पाटील, राहुल महाडिक, विक्रम पाटील यांची नावे पुढे येत आहेत. गत निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र भाजपाचे निशिकांत पाटील यांनी बंड केले. आता महायुतीत अजित पवार राष्ट्रवादीची, शिंदे शिवसेनेची भर पडली आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपात मतदारसंघ शिंदे सेना की भाजप कोणाकडे राहील यावरून उमेदवारी ठरले. मात्र एकास एक उमेदवारीसाठी गटबाजीने ग्रासलेल्या विरोधकांत एकीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लक्ष द्यावे लागेल.