राज्यात सध्या पोलिस भरती सुरू असून महिला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद दिसत आहे. पोलीस भरतीत 3,924 पदांसाठी सध्या भरती सुरू असून त्यासाठी 1 -2 नव्हे तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहे. विशेष म्हणजे अर्ज करणाऱ्या महिलांपैकी एक लाखांहून अधिक महिला उमेदवार या उच्चशिक्षित आहेत. मुंबईला सर्वाधिक पसंती असून एक लाखांहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केले आहेत. “बाईपणही लयभारी देवा !” असंच या आकड्याकडे बघून म्हणता येईल.
राज्य पोलीस दलातील 17 हजार 471 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्यासाठी एकू 16 लाख 88 हजार 785 अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील पोलीस शिपाई व चालकांच्या एकूण पदांपैकी 30 टक्के पदे महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे राज्यभरात एकूण 3924 पदं महिला उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्जांचा महापूर आला आहे. एकूण 2 लाख 78 हजार 829 महिला उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत. म्हणजेच प्रत्येक पदासाठी किमान 71 महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे.राज्यातील अनेक जागांपैकी मुंबई विभागाला सर्वाधिक पसंती आहे. मुंबईत 1257 पदांसाठी मैदानी परीक्षा सुरू आहे. त्यासाठी सुमारे 1 लाख 10 हजार महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दोन – तीन ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यात अनेकांनी मुंबईला पहिली पसंती दिल्यामुळे तुलनेने येथे अधिक अर्ज आले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यातील 66 केंद्रांपैकी 22 केंद्रांमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये मुंबई लोहमार्ग, मिरा – भाईंदर, नवी मुंबई, नाशिक शहर, छत्रपती संभाजी नगर शहर, सोलापूर शहर, अमरावती शहर,पालघर, सांगली, नाशिक ग्रामीण, अहमद नगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, बीड, जालना, यवतमाळ, लातूर, वाशीम, भंडारा, वर्धा व पुणे लोहमार्ग या २२ पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांचा समावेश आहे.