इस्लामपूर शहरात वाढतोय गुन्हेगारीचा आलेख…

इस्लामपूर पोलिस ठाण्यात काही महिन्यानंतर पुन्हा पोलिस निरीक्षक संजय हारुगडे रुजू झाले आहेत. शहर आणि परिसरातील गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. गुन्हेगारी थोपवण्यासाठी मोठे आव्हान आहे.गुन्हेगारीसह वाहतूक व्यवस्थेसह खासगी सावकारी आदी बेकायदेशीर व्यवसायाला ऊत आला आहे.आगामी निवडणुका शहरातील शांतता व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. विशेषतः शिराळा नाका, लाल चौक, आष्टा नाका, महाविद्यालय आणि खासगी शैक्षणिक क्लासेस परिसरात युवकांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. यातूनच पाहता मारामारी आदी गुन्हे घडत आहेत.

महाविद्यालयात येणाऱ्या मुलींची टिंगल-टवाळ्या करण्याऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. शहर आणि परिसरात गुन्हेगारी क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. यामध्ये खंडणीबहाद्दर, खासगी सावकार टोळक्यांनी एकत्रित येऊन मारहाण करणे. अशा आदी गुन्ह्यांची मालिकाच सुरू झाली आहे. चौका-चौकांतून गुटखा विकला जातो. तर काही पानपट्टीधारक छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करत आहेत. शहरात नशिल्या पानांची युवकांना भुरळ पडली आहे. दुसऱ्या बाजूने मात्र वाहतूककोंडीचा बोजवारा उडाला आहे. यावर नियंत्रणासाठी वाहतूक कक्ष कमी पडत आहे.

गांधी चौक, संभाजी चौक, लाल चौक, वाळवा बजार परिसर आदी ठिकाणी वाहतुकीची कोंडी डोकेदुखी ठरत आहे. एकेरी मार्ग आणि सम- विषम पार्किंग व्यवस्थेचाही बोजवारा उडाला आहे. बेकायदेशीर वाहने चालवणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. नुकतेच हजर झालेले पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.