वाळवा तालुक्यातील पेठ येथील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मंगळवारी आगमन झाले. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पारंपरिक वाद्याच्या गजरात जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावामध्ये प्रमुख मार्गावर स्वागत कमानी उभारल्या होत्या. या शोभायात्रेत शालेय विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ तसेच सर्व जाती-धर्माचे लोक आपल्या पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभागी झाले होते. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकीला कापूरवाडी येथून सुरुवात झाली. पेठ नाका, आंबेडकर पुतळा, पेठ गावचे प्रवेशद्वार, बाजारपेठ कदम गल्ली, धनगरवाडा, माणकेश्वर गल्ली, गोळेवाडी अशा या गावच्या प्रमुख भागातून पुतळ्याची मिरवणूक निघाली. घोडे, वारकरी सांप्रदायातील लोकांची व वारकऱ्यांची दिंडी, पोवाडा, झांज पथक, धनगरी ढोल, मर्दानी खेळांचे प्रकार यांच्यासह अन्य पारंपरिक वाद्याच्या गजरात शोभायात्रा संपन्न झाली. सम्राट महाडिक म्हणाले, प्रत्येक नागरिकांच्या मनात अभिमान दिसत होता.