काही महिन्यात म्हणजेच दिवाळीदरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे. सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झालेली आहे. मंडळाचे कार्यकर्ते खूपच जोमाने कामाला लागलेले आहेत.
इस्लामपूरच्या गणेशोत्सवामध्ये राजकीय शक्तिप्रदर्शन
आगामी विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळेच इस्लामपूर शहर आणि परिसरातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
या माध्यमातून चौका- चौकांत राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. मंडळांनी देखाव्याऐवजी मोठ उंचीच्या मूर्तीना पसंती दिली आहे. गांधी चौक, यल्लम्मा चौक, तहसीलदार कार्यालय परिसर, शिवाजी चौक, तानाजी चौक, पाटील गल्ली, डांगे चौक, लाल चौक रोषणाईने उजळून जाणार आहेत.
तर विविध स्पर्धा यासह सामाजिक कार्यक्रम, प्रसाद वाटप यावर गणेश मंडळांकडून भर दिला जात आहे.
मंडळांनी आरतीसाठी आतापासूनच आमदार जयंत पाटील, प्रतीक पाटील यांच्या वेळा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर विविध पक्षप्रमुखांना ही आरतीसाठी बोलविण्याचे नियोजन मंडळांकडून सुरु झालेले आहे.