ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हाती; शिंदे गटाला मोठा धक्का

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ९ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून निकालाचे पहिले कल हाती आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चांदेकरवाडी ग्रामपंचायतीत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सीमा हिंदुराव खोत यांनी विजय मिळवला आहे. हा शिंदे गटाला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यभरातील अंदाजे २९३ ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. शिवसेना-भाजपसोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, चांदेकरवाडी ग्रामपंचायत ताब्यात गेली असली तरी करवीर तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे.

दुसरीकडे जठारवाडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे. जठारवाडी ग्रामपंचायत स्थानिक आघाडीच्या ताब्यात गेली आहेत. तर भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. पिंपळगाव ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे गेली आहे.

सोलापुरात इंडिया आघाडीला मोठा धक्का

दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये इंडिया आघाडील मोठा धक्का बसला असून भाजप समर्थक आघाडीचे संपूर्ण पॅनल विजयी झालं आहे. भाजपचे ११ सदस्य निवडणूक आल्याची प्राथामिक माहिती आहे. दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणूक निकालात अजित पवार गट सर्वात पुढे आहे.

अजित पवार गटाने भाजप, शिंदे गट आणि इंडिया आघाडीला मागे टाकलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळायला सुरूपात झाली आहे. अजित पवार गटाच्या पाठोपाठ भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे सर्व निकाल दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत लागणार आहे.