महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या आदेशाने मंगळवारी (दि. 27) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र व्यापार बंदमध्ये कोल्हापुरातील सर्व व्यापार बंद ठेवून बंद यशस्वी करण्याचा निर्धार बुधवारी कोल्हापुरात झालेल्या जिल्हास्तरीय व्यापारी परिषदेत करण्यात आला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन व सर्व संलग्नित व्यापारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये आयोजित परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी 300 हून अधिक व्यापारी उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रमाकांत मालू म्हणाले, बंदचा निर्णय राज्यस्तरीय असून कोल्हापुरात कडकडीत बंद झाल्यास त्याचे लोन महाराष्ट्रभर पसरेल. त्यामुळे सर्व संलग्नित संघटनांनी पाठिंबा देऊन बंद यशस्वी करूया. कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, देशाच्या, राज्याच्या आर्थिक विकासात व्यापारी आणि उद्योगाची महत्त्वाची भूमिका असते. शासनाच्या जाचक अटी व नियमांमुळे व्यापारी अडचणीत सापडत आहेत. व्यापारी सक्षम तर देश सक्षम. त्यामुळे या अडचणींतून बाहेर पडण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे.