साऊंड सिस्टीमसाठी गणेश मंडळाकडून चक्क स्वागत कमान पाडण्याचा घाट

गणेशोत्सव (Kolhapur Ganeshotsav) असो वा इतर मिरवणुकांमध्ये भली मोठी साऊंड सिस्टीम (Sound System) लावण्याचे फॅड तरुणाईत मोठ्या प्रमाणावर आहे.अशा प्रकारची सिस्टीम जाण्यास अडथळा येत असल्याने एका मंडळाने चक्क गजानन महाराज नगरातील स्वागताची जुनी कमान पाडण्याचा घाट रचला. त्यासाठी जेसीबीही आणला.

त्याची माहिती मिळताच भागातील नागरिक व महिलांनी त्याला जोरदार विरोध केला.गजानन महाराज नगरातील एक मंडळाने गणेशोत्सवासाठी साऊंड सिस्टीम ठरवली आहे. ती भलीमोठी आहे. त्याची उंचीही जास्त असल्याने तेथील कमानीतून जाताना अडथळा येणार आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी सिस्टीमसाठी ती कमानच पाडण्याचे ठरवले.

एका दिवसासाठी वापरण्यात येणाऱ्या सिस्टीमसाठी कायमस्वरूपी असलेली जुनी कमान काढण्याचा निर्णय नागरिकांना आवडला नाही. त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर काहींनी विरोध केला. त्यावेळी कमानीचे दोन कॉलम बाजूला ठेवून इतर कमान पाडण्याचा प्रस्ताव दिला. तसेच उत्सव झाल्यानंतर पुन्हा कमान बांधण्याचीही चर्चा झाली. त्यातच आज थेट जेसीबी आणला. त्यामुळे परिसरातील नागरिक, महिला जमा झाल्या. त्यांनी विरोध केला.