बनावट सिमकार्डमधून मोठा घोटाळा ?

जिल्ह्यासह राज्यात बनावट सिमकार्ड वापरून अनेक ठिकाणी मोठमोठे घोटाळे झाले आहेत. अनेक डिस्ट्रिब्युटर या घोटाळ्यामध्ये जेलची हवा खात आहेत. त्यातूनच इचलकरंजी परिसरातील एक डिस्ट्रिब्युटर मालामाल झाला आहे.
फर्जी सिमकार्डमधून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करत आहे. दुसऱ्याच्या नावे असलेले सिमकार्ड वापरून त्याच्या नावे ‘ई-वॉलेट’चे खाते उघडून त्यातून व्यवहार सुरू आहेत. इचलकरंजीतील दोघांनी याविरुद्ध जिल्हा पोलिस कार्यालयाकडे तक्रार केली आहे.

कम्युनिकेशन व एंटरप्राइजेस या नावाने टेलिकॉम क्षेत्रामधील एका कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप इचलकरंजीतील एकाकडे आहे. या दोन्ही कंपन्या एकाच मालकाच्या आहेत. सिमकार्डसाठी विविध प्रकारची सूट देऊन त्याने इचलकरंजी परिसरातील अनेकांना त्याच्याजवळ असलेल्या कंपनीचे सिमकार्ड वाटले. त्यातील कागदपत्रांचा गैरवापर व कंपनीतील काही वरिष्ठांशी संगनमत करून बनावट सिमकार्ड उपलब्ध करून घेतले. त्यानंतर नागरिकांच्या नावावर असलेल्या सिमकार्डचा गैरवापर सुरू केला.

ग्राहकाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून मिळविलेली अनेक सिमकार्ड त्याच्याकडे आहेत. या सिमकार्डचा वापर करून बेहिशेबी ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण होते, अशी तक्रार जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालय व आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर येथे इचलकरंजीतील दोघा तरुणांनी केली आहे; परंतु या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. तक्रार दिल्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

ग्राहकाच्या कागदपत्रांचा दुरुपयोग करून त्याच्या नावे फर्जी सिमकार्ड घेऊन कर्ज काढले जात आहे. या कर्जावर डिस्ट्रिब्युटर व वरिष्ठांना कमिशन मिळते. या कमिशनची टक्केवारी मोठ्या प्रमाणात आहे. वरिष्ठांशी संगनमत असल्यामुळे ताबडतोब कर्ज मंजूर होते. कर्ज उपलब्ध करून देण्याची चर्चा होते. ओटीपी सेंड करणे तसेच अनेक मेसेज यावर केले जातात.

त्यानंतर त्या सिमकार्डच्या ई-वॉलेटवर हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. घोटाळेबाज युवकाला साताऱ्यातील जनतेचे काही रक्षकच मदत करत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे त्याच्यासोबत सातारच्या त्या रक्षकाचीसुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.