जसजसा सप्टेंबर महिना जवळ येऊ लागला आहे गणरायाच्या आगमनाची आतुरता वाढत चालली आहे. यामध्येच मुंबईतील लालबाग परिसरातील चिंचपोकळीच्या गणपतीच्या आगमनाची आतुरता गणेश भक्तांना असते. दरवर्षी या ठिकाणी बाप्पााच्या आगमनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते. तर, याच बाप्पाच्या आगमनाची तारीख चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे.
आपल्या लाडक्या चिंतामणीचं देखणं रुप भरभरुन पाहता यावं आणि आगमन सोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक या परिसरात येतात. या ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पडतो. यंदा गणपतीच्या मूर्तीचं स्वरुप काहीसं हटके असणार आहे. तसेच, बाप्पाचा मंडपदेखील भव्य पद्धतीने सजविण्यात येणार आहे.
खरंतर, चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ हे मुंबईतील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सर्वच भक्तांना या गणपतीच्या आगमनाची चाहूल लागलेली असते. भक्तांची हीच उत्सुकता लक्षात घेऊन मंडळाच्या वतीने चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, यंदाचा चिंतामणी आगमन 31 ऑगस्ट 2024 रोजी शनिवारी पार पडणार आहे. दुपारी 2 वाजता हा आगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.